Total Pageviews

Friday, 9 July 2021

साधक आणि साधन


 

राजा भोज मोठा दानशूर होता. त्याची एक सवय होती की जेव्हा तो दान देण्यासाठी हात समोर करी  तेव्हा तो आपली नजर खाली झुकवून घेत असे.

      

ही बाब सर्वांनाच खटकत असे. असा कसा हा दानशूर राजा जो दानही देतो आणि ते देतांना त्याला लाजही वाटते.

 

जेव्हा राजा भोजची ही किर्ती संतश्रेष्ठ तुलसीदासांच्या कानी पडली, तेव्हा त्यांनी खालील चार ओळी लिहून त्या राजाला पाठवल्या -

 

ऐसी देनी देन जु

कित सीखे हो सेन।

ज्यों ज्यों कर ऊँचौ करौ

त्यों त्यों नीचे नैन।।

 

म्हणजे हे राजन, आपण हे असलं दान देणं कुठून शिकलात? जसजसे आपले हात दान देण्यासाठी वर येऊ लागतात तसतशी आपली नजर खाली खाली कां झुकू लागते?

 

बदल्यात राजा ने जे उत्तर तुलसीदासांना लिहून पाठवलं ते मोठं सुंदर होतं. ज्यांनी ज्यांनी राजाचं हे उत्तर वाचलं ते ते सर्व तर राजाच्या प्रेमातच पडले. इतकं सुंदर उत्तर आजपर्यंत कुणीही कुणालाच दिलं नसेल.

 

राजाने तुलसीदासांना उत्तरात लिहिलं -

 

                                         देनहार कोई और है

भेजत जो दिन रैन।

लोग भरम हम पर करैं

तासौं नीचे नैन।।

 

म्हणजे, देणारा तर तो कोणी दुसराच आहे. तो ईश्वर, तो परमात्मा तोच रात्रंदिवस  लोकांना दानधर्म करीत असतो. परंतु लोकांना मात्र वाटत असतं की दानधर्म मी, त्यांचा राजाच करतोय. आणि या विचारानं मला माझीच लाज वाटत असते आणि माझे डोळे आपोआप लवतात.

 तोच करतो आणि तोच करवून घेतो तू फक्त निमित्त आहेस, कशाला अभिमान बाळगतोस?

~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~

शरिर तो बस  एक साधन जाण

सो साधक कभी होय I

हॄदय मा जे  बैठो ईश

सो असली साधक होय II

तुझे शरीर म्हणजे काही तू नव्हेस . शरीर म्हणजे कर्ता नव्हे तर , ते त्या कर्त्याचे साधन मात्र आहे .तेव्हा शरीर म्हणजे  तूच  ( कर्ता व साधक ) आहेस या भ्रमांत तू राहू नकोस .तू शरीर नव्हेस . जो सर्व व्यापी आहे ,सर्व  ज्ञानी आहे , तो  ईश च खरा कर्ता , खरा साधक आहे . तुझ्या हृदयांत त्याचाच   वास आहे , तोच तू  आहेस . त्याच्या पासून तू आणि तुझ्या पासून तो वेगळा नाही

 

अजय सरदेसाई

//२०२१  , १०:५५ AM