प्रथम
वंदून श्री सद्गुरु चरण आणी नमून सरस्वती गजानन करितो प्रारंभ सांगावया श्री सद्गुरु
कथन.
सुरुवात
श्री ज्ञानेश्वर माउलींच्या ह्या सुंदर अभंगाने करावीशी वाटते
मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुलें वेचिता बहरु कळियांसी आला
मोगरा फुलला, मोगरा फुलला
इवलेसे रोप लावियेले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावरी
मोगरा फुलला, मोगरा फुलला
मनाचिये गुंती गुंफियला शेला
बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला
मोगरा फुलला, मोगरा फुलला
संत श्रेष्ट ज्ञानेशवरांच्या ह्या सुंदर अभंगाचा नीट अर्थ उमजणे
अत्यंत अवघड आहे . तो अर्थ लावून दुसऱ्यांना समजावणे तर त्याहूनही कठीण .प्रत्येकाने आपापल्या भावानुसार त्याचे अर्थ लावले आहेत आणी त्या त्या
वेळेला त्या भावनेनुसार तो अर्थ बरोबर आणी पूरक आहे असे मला वाटते .हीच तर संत श्रेष्ट
ज्ञानेश्वरांची किमया आहे .त्यांच्या भक्ती आणी ज्ञान रसांनी नटलेले अभंग प्रत्येकाला
त्याच्या घेण्याच्या कुवती नुसार काही न काही देवूनच जातात . कोणिही रिता परतत नाही
.मी ही माझ्या भावनेनुसार मला भावलेला अर्थ इथे प्रगट करत आहे.
संत श्रेष्ट ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंची महती (निवृत्ती
नाथ महाराजांची) ह्या अभंगाच्या निमित्याने
अगदी थोडक्या शब्दांत मांडत आहेत .
ज्ञानेश्वर महाराजांना गहिवरून आले आहे आणी ते सद्गुरुचरणी अत्यंत
लीन होऊन म्हणताहेत की ,तुम्ही माझ्यात लावलेल्या ह्या ज्ञानाच्या (मोगऱ्याच्या) रोपट्याला
आता फुलें आली आहेत .हि ज्ञानरूपी मोगऱ्याची फुलें मी जेव्हढी म्हणून वेचीत आहे तेव्हढा त्या वेलीला आणखी बहर येत आहे आणी माझे ज्ञान वाढतच आहे . नित्य नवीन कळ्या
येतच आहेत आणी मोगऱ्याची फुलें फुलतच आहेत . त्यांना अंतच नाही . त्या ज्ञानरूपी मोगऱ्याच्या सुगंधाने माझे
चित्त मोहरून टाकले आहे .तुम्ही माझ्या द्वारी लावलेली हि ज्ञानरूपी इवलीशी मोगऱ्याची
वेल आता गगनाचा ठाव घेवू लागली आहे .त्या वेलीला आता आकाश ही ठेंगणे होवू लागले आहे .त्या ज्ञानाचा परिमल इतरत्रही पसरुलागाला
आहे.आपल्या मनाच्या गुंतीने ,बुद्धीच्या दोऱ्याने ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या ज्ञान
फुलांचा एक सुंदर भक्तिरूपी भरजरी शेला विणून तो त्या निर्गुण निराकार परब्रम्ह: विठ्ठलाला अत्यंत
भक्ती भावाने अर्पण केला आहे.तो पर ब्रम्ह: म्हणजेच महाराजांचे सद्गुरु श्री निवृत्ती
नाथ महाराज होत, कारण त्या विठ्ठला मध्ये आणी त्या सद्गुरून मध्ये वेगळे असे काय आहे? त्याच बरोबर असे ही म्हणता
येईल कि महाराजांनी हा शेला अर्पून आपल्या आई वडिलांची (विठलपंत आणीरखुमाबाई
) कृतज्ञता व्यक्त केली आहे .त्यांच्या पोटी मनुष्य देहाने जन्म घेऊन ते धन्य झाले . त्यामुळेच त्यांना निवृत्ती नाथांसारखे
सद्गुरु प्राप्त झाले. स्वत: मागे राहून , कोणताही मोठेपणा व उपाधी न घेता त्यांनी ज्ञानेश्वर माउलींना पुढे करून लोकहिताचे कार्य त्यांच्या कडून साधून घेतले.