Total Pageviews

Tuesday, 12 May 2026

किती जंन्मांचा फेरा बाकी...


 

दृश्य नी अदृश्य ब्रम्हांडात तू कुठे अभिजात,
हा प्रश्न का घुमतो अक्षर माझ्या सुप्त मनात।।

न दिसशी तरीही अस्तित्व तुझे प्रत्येक क्षणात,
जाणवते तुझे स्पंदन रंध्रा-रंध्रात, हृदयाच्या कंपनात॥

मिटता डोळे जाणवतोस तू श्वासांच्या लयीत,
उघडता नेत्र हरवून जातोस दृश्यांच्या गर्दीत।।

वाळू निसटून जावी तसा निसटतोस तू,
तरी बिलगून असतोस तू माझ्या आभासात।।

प्राण कासावीस माझे मन माझे बेचैन रे,
चकोरासम तृषा वाढते, पिण्यास कैवल्य चांदणे रे।।

तु आहेस सर्वत्र जरी मला कधी भेटशील का?
तिष्ठतो मी तुझ्या साठी तसा तू ही तिष्ठतोस का?

सांग ना घडणार कधी जिवा-शिवाची भेट ही,
किती जंन्मांचा फेरा बाकी अजुन दृष्टी येण्यास ही।।

मंगळवार, १२/५/२६ , १२:३० PM
अजय सरदेसाई -मेघ

Sunday, 10 May 2026

कुंडलिनी — सप्त चक्र जागृती : तांत्रिक अर्थ

 


मूलाधार

 

करकोटक करावलंबीत करावली करणं करम

भुजंग भुंजित; मग भग भुयांत भुमी भं

सवितृ सार्वभौमं सतउर्जा सर्वत्रं सर्वायुतं।।

 

स्वाधिष्ठान

 

वरुण वलयित वाहिनी वर्धमान वासना

वंश वळण वळवळ; वाट वर वर वहे

विमल विशाल विश्वंभर विसर्ग विलयं।।

 

मणिपूर

 

रवि रश्मी रंजित रण रोमांच रोषं

राग रूप रम्य; रती रती रापतो रे

ऋजु ऋद्धि ऋषि ऋतं ऋतुचक्रं ऋतायतं।।

 

अनाहत

 

यान यायावर यमुना यात्री यमं

योग योनी यत्न; येई येई येई रे

यशोदा यशस्वी यशोमय योगायोगं।।

 

विशुद्ध

 

हंस हरि हरण हल्लाळ हावभाव

हिम हर्ष हळुवार; हळू हळू हं हं हं

हिरण्यगर्भं हिरण्यकश्यप हिरण्यायतं।।

 

आज्ञा

 

अंतर अंतरी अंतरात्मा अंकित अं

अज्ञान अलय अलोट; अखंड अभेद्य अं

ओंकार ओजस्वी ओतप्रोत ओम ओमायतं।।

 

सहस्रार

 

शून्य शांत शाश्वत शरण शमनं

सहस्र सहस्रदल; सर्व सर्व सर्व रे

 

Silence

 

॥ ॐ ॥

 

 

 

 

१. मूलाधार (पृथ्वी तत्व — बीज: लं)

करकोटक — महाभारतातील सर्पराज; तांत्रिक दृष्ट्या कुंडलिनी शक्ती साडेतीन विळखे घालून मूलाधारात सुप्त अवस्थेत असते

करावलंबीत — ती शक्ती स्वतःच्याच हाताने (करेने) स्वतःला आधार देऊन बसलेली — स्वयंपूर्ण बंधन

भुजंग भुयांत — सर्प (प्राणशक्ती) पृथ्वीतत्वात, स्थूल देहात गुंफलेला

भं — पृथ्वी बीजाक्षर

सवितृ सार्वभौमं — जागृतीचे अंतिम लक्ष्य सूर्यचेतना आधीच सांगितलेले — अंत आणि आरंभ एकाच वेळी दिसतो

तांत्रिक सार: शक्ती झोपलेली आहे, पण तिचे गंतव्य जाणते

२. स्वाधिष्ठान (जल तत्व — बीज: वं)

वरुण वलयित — वरुण = जलदेव; वलयित = वर्तुळात बांधलेले — जलतत्व चक्राकार फिरते

वासना वर्धमान — स्वाधिष्ठान हे कामशक्तीचे, सृजनशक्तीचे केंद्र — वासना वाढतेच

वंश वळण — वंश = पिढी; जलासारखे वळण घेत प्रवाह पुढे जातो — सृष्टी सुरू राहते

विमल विश्वंभर विसर्ग विलयं — शुद्धीकरणानंतर विसर्ग (त्याग/मोक्ष) आणि विलय (विश्वात विरघळणे)

तांत्रिक सार: कामशक्तीचे रूपांतर सृजनशक्तीत — ऊर्जा वर चढते

३. मणिपूर (अग्नि तत्व — बीज: रं)

रवि रश्मी रंजित — मणिपूर = मण्यांचे नगर; सूर्यासारखे तेजस्वी, किरणांनी प्रकाशित

रण रोमांच रोष — अग्नितत्व = इच्छाशक्ती, संघर्ष, क्रोध — हे सर्व येथेच जन्मतात

राग रती — राग (आसक्ती) आणि रती (आनंद) अग्नीत भाजले जातात

ऋतं ऋतुचक्रं ऋतायतं — ऋत = विश्वनियम; अग्नी सर्व ऋतू, सर्व नियम चालवतो

तांत्रिक सार: अहंकार आणि इच्छा अग्नीत जळतात — शुद्ध इच्छाशक्ती उरते

४. अनाहत (वायु तत्व — बीज: यं)

यान यायावर यात्री — अनाहत = हृदयचक्र; आत्मा यायावर (भटका) यात्री आहे — वायूसारखा मुक्त

यमुना यमं — यमुना = प्रेमाची नदी (कृष्णाची); यम = मृत्यू — हृदयात प्रेम आणि मृत्यू दोन्ही

योग योनी यत्न — योनी = उगम; येथे योगाचा खरा उगम — प्रयत्नाने नाही तर प्रेमाने

यशोदा यशोमय — यशोदा = निःस्वार्थ मातृप्रेम; अनाहतात स्वार्थ नाही

तांत्रिक सार: वैयक्तिक प्रेम विश्वप्रेमात विरघळते

५. विशुद्ध (आकाश तत्व — बीज: हं)

हंस — हंस = सोहम् मंत्राचे प्रतीक; श्वासाबरोबर "सो-हम्" (मी तोच आहे)

हरि हरण — हरि = विष्णू/हरण करणारा; पाप हरण, द्वंद्व हरण

हिम हर्ष हळुवार — बर्फासारखे शांत, थंड, हळुवार — आकाशतत्व निःशब्द

हिरण्यगर्भं — हिरण्यगर्भ = सुवर्णगर्भ ब्रह्म; सृष्टीचा मूळ नाद येथून — विशुद्ध नादाचे केंद्र

हिरण्यकश्यप — अहंकाराचे प्रतीक; विशुद्धीत अहंकाराचा नाश

तांत्रिक सार: नाद, वाणी, श्वास — सर्व शुद्ध होतात; "हं सः"

६. आज्ञा (मन + प्रकाश — बीज: ॐ)

अंतर अंतरी अंतरात्मा — तीन स्तर: बाह्य मन अंतर्मन आत्मा तिन्ही एकत्र येतात

अज्ञान अलय अलोट — अज्ञानाचा पाया (अलय) उलटतो — अलोट म्हणजे न थांबणारे

अखंड अभेद्य — द्वैत संपते — गुरु-शिष्य, शिव-शक्ती एक होतात

ओंकार ओजस्वी ओतप्रोत — ओंकार सर्वत्र भरलेला — ओज (तेज) ओतप्रोत वाहते

तांत्रिक सार: तृतीय नेत्र उघडतो — द्रष्टा आणि दृश्य एक होतात

७. सहस्रार (तत्वातीत — बीज: निःशब्द)

शून्य शांत शाश्वत शरण — चार अवस्था: शून्य (रिक्तता) शांत शाश्वत शरण (समर्पण)

शमनं — सर्व क्रिया, सर्व विचार शमन — पूर्ण विराम

सहस्र सहस्रदल — सहस्र = हजार; हजार पाकळ्यांचे कमळ उमलते — पूर्ण जागृती

सर्व सर्व सर्व रे — भाषा संपते, पुनरावृत्तीच उरते — शब्द अपुरे पडतात

Silence — ॥ ॐ ॥ — भाषेच्या पलीकडे जे आहे ते