अस्तित्व त्यांचे मात्र तुझ्या संकल्पाने,
हे चंद्र, सूर्य, तारे गातात तुझेच गाणे।।
दत्ता, तुझ्याच चरणी मज सदोदित राहणे,
जन्मोजन्मी तुझ्या चरणी हेच गार्हाणे।।
सुख-दुःखाच्या लहरींचे येणे आणिक जाणे,
हे चंद्र, सूर्य, तारे गातात तुझेच गाणे।।
मायावी या जगती किती नातीगोती जुळणे,
क्षणभंगुर सावल्यांचे जसे येणे आणि जाणे।।
शाश्वत तुझे नामी माझे अंतःकरण विसावणे,
हे चंद्र, सूर्य, तारे गातात तुझेच गाणे।।
तुझ्या कृपेच्या छायेत शांत होई माझा जीव,
अंतरात माझ्या विसावला तो शुभांकर शिव।।
दुःखांच्या वाटेवर माझ्या तू दीप होऊनी येणे,
हे चंद्र, सूर्य, तारे गातात तुझेच गाणे।।
जपता तुझे नाम बंध सारे विरघळती,
मनातील संशयांचे कृष्णमेघ दूर पळती।।
अंधारल्या दिशांना तू पुन्हा उजेड देणे,
हे चंद्र, सूर्य, तारे गातात तुझेच गाणे।।
तूच श्वासांत माझ्या, तूच अंतरीचा नाद,
तुझ्याच इच्छेनेच घडतो स्वामी आपला संवाद।।
स्थिर तुझेच नामी आता माझे हे जगणे,
हे चंद्र, सूर्य, तारे गातात तुझेच गाणे।।
हे विश्व सारे दत्ता तुझ्या हृदयीचे गाणे,
ब्रह्मांडाच्या कणाकणात तुझेच दिव्य स्पंदणे।।
तू असताना राया मला रे काय उणे?
हे चंद्र, सूर्य, तारे गातात तुझेच गाणे।।
मंगळवार, २०/५/२६ , ६:४५ PM
अजय सरदेसाई -मेघ
अजय सरदेसाई -मेघ

No comments:
Post a Comment