Total Pageviews

Friday, 6 March 2026

जागृती


एक क्षणाचाही निमिषार्ध तो क्षणकाळ,
त्या निमिषार्धात मी पाहिला अवकाश-काल।

काळ विरला, विरलं अवकाशही,
उरलो फक्त मी — महाकाल।

ब्रह्मांडाच्या प्रवाही स्पंदनात मीच,
आदि होतो, आहे, अंतीही मीच सर्वकाल।

ब्रह्मांडाच्या रंधा-रंध्रातून वाहतो मीच,
मी अरूप, मीच सर्वरूप — मीच अकाल।

ना स्थूल जाग, ना स्वप्न, ना सुषुप्तीचे जंजाळ,
अवस्थातीत निखळ चैतन्य - जागृतीचा अक्षरकाल।

सोमवार, २/३/२६ , ७:४० PM
अजय सरदेसाई -मेघ

Tuesday, 3 March 2026

दत्त प्रार्थना




 

कृपेची तुझी सावली, दत्ता माझ्यावर
उन्हातही गारवा, जेव्हा हात तुझा डोक्यावर
काय केले पुण्य मी, कळेना मज काही
साथ तुझी आहे दत्ता, भीती न उरे काही ॥

आई तूच, बाप तू, तूच माझा धनी
चुकता वाट माझी, धरशी हात त्या क्षणी
अंधारल्या रस्त्यावर, दीप तुझा जळे
मनातील तम सारा, हळूच दूर पळे ॥

न मागता दिलेस तू, सुखाचे हे दान
ऋणी तुझा जीव हा, कसा फेडू मान
नाव तुझे घेताच, निवळे तन-मन
शांतता श्वासात भरते, स्थिर होते जीवन ॥

धर्म दे, अर्थ दे, काम दे, दे मोक्षवाट
कामना निर्मळ ठेव, असो सद्बुद्धीची साथ
चारही पुरुषार्थ, फुलू दे सहज
तुझ्या कृपेने होवो सफल ही कांक्षा सहज ॥

शेवटचा श्वास जेव्हा, घेईन मी अलवार
चरणी तुझ्या ठेवीन सर्वस्व एकवार
मेघ विरघळून जाईल, होईल तुझ्यातच लीन
दत्ता तूच उरशी, मीपण होई क्षीण ॥

मंगळवार, ३/२/२६, १:३१ PM
अजय सरदेसाई – मेघ