नयनमनोहर रूप तुझे, पांडुरंगा पावन थोर ।
विटेवरी तू उभा रहावा, आम्हांस समचरणांचा धीराधार ॥१॥
डाव्या पदावर चिन्ह शुभ, भक्तप्रेमाचं त्यात तेज ।
मांड्यांमधे गुराख्याची काठी, गोपाळ लीला अद्भुत सहज ॥२॥
कटी पितांबर कसुन भर्जरी,सुवर्ण मेखला सजली त्यावरी
शुभ्र कमळ दक्षीण करी , पांचजन्य स्थिर वाम करी ॥३॥
नाभीअसे ब्रह्मज्योती,ब्रम्हांडाचे तेचि बीज ।
वक्षस्थळी रुक्मिणी विराजित , जाणे मनाचे गुज ॥४॥
गळ्यात तुळशीमाळ दाटे, कौस्तुभमणी दीपे तेज ।
गूढ स्मित मुखकमलावर, डोळ्यांत कृपेचा साज ॥५॥
मकर कुंडले कानात ती, शोभे दैवी अलंकार ।
भाळी तिळक कस्तुरीचे, लेवीसी भक्तचरणांचा अबीर त्यावर ॥६॥
माथ्या वरती शिवपिंडी, त्यावर तेजोमय मुकुट ।
शिव विष्णूचा जेथे संगम,तो पांडुरंग तूं साक्षात ॥७॥
पायापासून शिरोबिंदू, तुझं दर्शन गुढ अपार ।
मेघ म्हणे विठूमाऊली , तूच आमुचा संसार! ॥८॥
रविवार , ६/७/२०२५ (आषाडी एकादशी ), ०२:१० PM
अजय सरदेसाई (मेघ)