Total Pageviews

Saturday, 1 March 2025

तुज विन शंभो मज कोण तारी


कुल देव माझा सप्तकोटेश्वर निरंकारी

कृपा नी मायेची सावली धरी मजवर निरंतरी

जगाचा नियंता वसे हृदयी माझ्या अंतरी

तुज विन शंभो मज कोण तारी

 

जलाभिषेक मी धरला संतत शिवाच्या माथ्यावरी

सुवासिक शुभ्रफुले वाहतो मी शिव लिगांवरी

अर्धोन्मलित नेत्र मनमोहक स्मित त्याच्या मुखावरी

तुज विन शंभो मज कोण तारी

 

स्मरण तुझे होता मन माझे घेई भरारी

रोमांच उभे राहिले शरीरात कंप भारी

सिंहासनी बसला कर्पुरगौर शेजारी गौरी

तुज विन शंभो मज कोण तारी

 

आभा विलक्षण पसरली सभोवारी

शिवपुजनांत रमले पहा सर्व नर नारी

प्रसन्न होऊन पाहे भक्तांसी माझा त्रिपुरारी

तुज विन शंभो मज कोण तारी

 

जवळ आली शुभ घटिका ती मनोहारी

शिवाच्या गळ्यात पुष्प माळा घाली गौरी

माता उमेस पहा माझा चंद्रमौळी वरी

तुज विन शंभो मज कोण तारी

 

दुमदुमला मृदंग नाद, सभेत वाजली तुतारी

शिवगण नाचती होऊन मग्न आनंद लहरी

स्वर्गातुन बरसल्या अक्षता त्या कैलासावरी

तुज विन शंभो मज कोण तारी

 

बुडालो बुडालो रे आकंठ मी शिव भक्तीत

शिव माझ्यात विरला नि मी विरलो शिवांत

वृतांत काय वर्णु हा अजबभारी

तुज विन शंभो मज कोण तारी

 

बुधवार,२६//२५,१५:०७ hrs.

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment