Total Pageviews

Sunday 31 March 2024

लपलासी कोठे


आता होतासी 

लपलासी कोठे

सख्या पांडुरंगा

शोधू तुज कोठे

 

लपंडाव देवा

का खेळिसी

पोच माझी नाही

तुज शोधू मी

 

मन ना निर्मल

बुद्धी ना विमल

मी दुर्बल सर्व ठायी

कागा विठाई परिक्षिसी

 

धरी हात आता

का देसी चिंता

भवार्ण तरावया

मज बळ नाही

 

जरी तु देवा

आला भेटीस

नाव रख्माईस

बघ सांगेन मी

 

या उपरी जरी

तू कृपा करी

चंद्रभागा कुशीत

देवा जाईन मी

 

'मेघ' म्हणे देवा

तिढा सोडवा हा

खेळ तो मांडावा

किती तव भक्ताचा

 

रविवार, ३१/०३/२०२४  , ०५:३२ AM

अजय सरदेसाई (मेघ)


Friday 29 March 2024

परमात्मा परात्परू



परमात्मा परात्परू

पाविजे मज लौकरू

मी विश्वाचे लेकरू

प्रार्थी तुझे ठायी

 

तव चित्त चिदंबरू

काया ती अगोचरू

ते चक्षू सोम-सुर्यु

तुज देखिजे केवी

 

मज नको अष्ट सिद्धी

मज नको नव निधी

सदा जवळिक तुझी

देई कृपाळा

 

सहस्रसाराचा परिमळु

परमानंद आळुमाळु

मिळो दे रे कृपाळू

नित्य  मज

 

तूची सदा सर्वकाळ

करशी माझा संभाळ

माझे तुची आभाळ

न करी आबाळ

बालकाची

 

आता सरते शेवटी

तव एकची विनंती

मुक्ती द्यावी गोमटी

सायुज ती

 

 

चिदंबर = आकाश

अगोचर = पार्थिव नेत्रांस दिसणारे

चक्षु = डोळे

सोम-सुर्यु = चंद्र-सूर्य

देखिजे केवी = कसे पाहावे

सहस्रार = सहस्त्र दल कमल

परिमळु = सुगंध

आळुमाळु = थोडं थोडं

शुक्रवार , २९/०३/२०२४  ०६:२५ PM

अजय सरदेसाई (मेघ ) 


Thursday 28 March 2024

शेवटचा पाश


 

मला आणले जेथे ते स्मशान होते

कळले शरीर माझे गतप्राण होते

चौथऱ्यावर होती चिता मांडलेली

प्रेत माझे ज्यावर जणू सामान होते  

दक्षिण दिशेस होती मांडली पिंडे 

कावळे झाडावर का सावधान होते

सोपस्कार सर्व उरलेले पूर्ण झाले 

शरीरास नमुन लोकांचे प्रस्थान होते

दुःखात काही,ओठांवर काही स्मित

जाणे काय मना त्यांच्या अवधान होते

पेटली शेवटी ती चिता जी होती शांत 

शेवटचा पाश तुटला ,वर अस्मान होते   

 

गुरुवार , २८/०३/२०२४   , ०१:४८ PM

अजय सरदेसाई (मेघ )

Wednesday 27 March 2024

वैतर्णी


तू हे जिवन मैथुन जाण

ते जीवाने मिथ्या जगावे

इच्छा सुटण्याची होता 

सद्य शरीर लागते सोडावे

 

घालमेल होत असे जिवाची

न जाणो ते काय घडावे

स्वर्गा ची ईच्छा असता

नर्कात स्व:कर्माने न्यावे

 

कोण हिशेब ठेवील याचा

जीवास कसे सर्व ज्ञात रहावे

तो चित्रगुप्त जी देईल शिक्षा

जिवास ते सर्व लागे भोगावे

 

जेव्हा शरिराचे होते कलेवर

पोहचतो जीव वैतर्णी घाटावर 

त्या वैतर्णी चा प्रवाह विक्राळ

उठती ज्वाळा न दिसे तळ

 

एक ही नाव नोहे घाटावर

जीवास पोहचणे पैलतीर

भले भले थरथरले वीर

पिण्यस इथे न मिळे निर

 

पुढचा जन्म कोणता जीवाचा

नी कोणत्या योनीत मिळावा

दुर्गुणात लिंपुन जीव राहता

घाणित किडा तो वळवळावा

 

जीवाने कर्मरहित असावे

सदा नामःस्मरण ते करावे

कुकर्मा पासून दूर राहावे

धर्म परायण सदा असावे

 

असे केल्यास न कोणती चिंता

देह सोडताच जीव पावे अनंता

तो असे वैतर्णी पासून खूप दूर

परम ईश तो परमानंदाचा चे पूर  

 

बुधवार , २७/०३/२०२४  ०९:३५  AM

अजय सरदेसाई (मेघ )

Wednesday 6 March 2024

सुखावलो तव दर्शने देवा


 

सुखावलो तव दर्शने देवा आता मज काही खंत

आणि काय मागु देवा मागण्यास ना काही अंत।।


तु असतांना काय उणे देवा समाधानी माझे चित्त।

जोवर तुझा हात मस्तकी माझ्या मी राहतो निवांत।।


नाम तुझे घेता दिसे तुझे रुप ते अनंत।

"मेघ " म्हणे तव दर्शने मी झालो बहु श्रीमंत ।।


येणे जाणे नुरले आता झालो मी तटस्थ

ज्ञानेंद्रिय सर्व उलटी होऊन पडली आत निचेष्ठ ।।

 

 ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।

 

बुधवार,०६/०३/२०२४ , १०:१५ PM

अजय सरदेसाई (मेघ)