Total Pageviews

Tuesday, 27 May 2014

कर्म मुक्ती



जीवाला जन्म मिळाला की त्याबरोबरच कर्म ही आलेच असे संत म्हणतात .किंबहुना जन्म हे पूर्व कार्मांचेच फलित आहे असे वेदांत सांगतो . पूर्व जन्मांच्या कर्मांचे फलित भोग ,  भोगण्यासाठीच आपल्या सारखी सामान्य माणसे जन्म मरणाच्या फेर्यात अडकून पडतात . तेव्हा कर्म हे काही  टाळता येत नाही आणि कर्म केले की त्याचे फळ हे मागून येतेच ( Cause will have an effect  or every effect has a cause    )  मग जन्म व मरणाचा हा फेरा चुकवावा तरी कसा ? हा तिढा सुटणार तरी कसा ? मोक्ष मिळणार तरी कसा  ?



पहिले आपल्याला हे उमजणे आवश्यक आहे कि कर्म घडतात तरी कशी ? कर्माचे मूळ अधिष्ठान कुठे आहे ? विचार केला कि लक्षात येते कि कर्माचे मूळ ' इच्छा ' हे आहे . इच्छाच   कर्मेंद्रियांना कर्म करण्यास भाग पाडते. मग  ‘ इच्छा ’ कुठून उत्पन्न होते ? तर ती मनातून उत्पन्न होते . म्हणजेच सर्व कर्मांचे मूळ हे आपले मन आहे . मनात इच्छा का उत्पन्न होतात ? मन हे अहं भावनेने भरलेले असते. ते सतत आपले अस्तित्व दाखवण्या साठी झघडत , धडपडत असते . आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते सतत इच्छा निर्माण करत असते व कर्म घडवून आणत असते . मन हे इच्छे वरच  जगते . कर्मांच्या फालावारच ते जगते व पोसले जाते . कर्म संपली की मनाचे अस्तित्वच संपले . वेदांत व संतांची उक्तीच आहे की ' मन ' मेले की ' अहं किंवा ' मी ' मारतो , ' मी ' मेला की कर्म कसे घडणार ? घडणारच नाही ! , आणि कर्माच जर संपले तर फळ कोठून येणार ? फळच नाही  तर ते भोगायला जन्म कुठचा ?



आपण वर पहिले की कर्म कसे घडते . पण कर्म म्हणजे नेमके काय ? त्याची संज्ञा काय ?  हे पडताळण्याचा प्रयत्न करू ? समजा की तुम्ही या जगात एकटेच आहात दुसरे कुणीच नाही ! मग तुम्ही खाता , पिता , झोपता ,चालता , फिरता , विश्रांती घेता तेव्हा कर्म घडते का ? नाही घडत ! हे कर्म जरी असले तरी ते वेदांतात अपेक्षित असलेल्या कर्मांच्या संज्ञेत बसत नाहीत . तेव्हा ही कर्मे नव्हेत . आता समजा तुम्ही चालला आहात . चालता  चालता तुम्हाला एक मुंगी दिसली व तुम्ही तिला ठेचलीत तर हे मात्र कर्म झाले .  किंव्हा तुम्ही समुद्र किनार्यावर फिरत असताना एक व्यक्ती बुडताना पाहून तुम्ही त्या व्यक्तीला बुडण्यापासून वाचविलेत तर हे सुद्धा कर्म या संज्ञेस पात्र ठरते . तेव्हा विचार केल्या वर लक्षात येईल की कर्म घडण्या साठी त्या कर्माचे संस्कार एकापेक्षा अधिक जीवांवर घडले पाहिजेत . तेव्हाच कर्म घडते . हे असे आपले मला वाटते , तुम्हाला ते पटेलच किंव्हा पटलेच पाहिजे असे नाही . पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या .

 

आता आपण पहिले की , मनातल्या ' मी ' ला मारले की मन मरते . मन मेले की कर्म घडत नाही . मग मनाला मारावे म्हणजे काय ? व ते कसे करावे ?

कठ उपनिषदांत सांगितल्या प्रमाणे कर्म ही  दोन प्रकारची असतात . एक असते ' श्रेयस कर्म ' व दुसरे असते  ' प्रेयस कर्म ' . जीवाने  कोणत्या कर्माचा आचार करावा हे सर्वस्वी त्याच्या हातीच असते .मनाचा कल हा नेहमी प्रेयासाकडे असतो . तो प्रथम श्रेयासाकडे वळवायला हवा कारण प्रेयासामधून फक्त विषय सुखाची प्राप्ती होते व ' मी ' ची लालसा वाढते . मग मन श्रेयस कर्मा कडे कसे वाळवावे ? तर ते विवेकाने वाळवावे . विवेक बुद्धीत असतो पण  बुद्धिलाच जर मानतील विषयांनी ग्रासले असेल तर विवेक कसा टिकेल ? विवेक हे एकमेव शस्त्र आहे जे मनावर विजय मिळवून त्या ' मी ' ला मारण्यास समर्थ आहे .  ते नसेल तर काही उपयोग नाही . मग हे शस्त्र मिळवावे कुठून ? संत संगतीने व सद्गुरुंनी दिलेल्या नामांत राहूनच ते मिळवता येते . ते एकदा मिळाले की श्रेयसचा प्रेयासावर विजय मिळवता येतो . तो विजय मिळवला की ' मी ' मेलाच म्हणून समजा . ' मी ' मेला की मनाचे अस्तित्व संपलेच की हो ! मन संपले की  द्वैत संपते , द्वैत संपले की कर्मा नष्ट होतात . एकट्याने का कर्म होतात ? जिथे अद्वैत आहे , तिथे कोठला ' मी ' नी  कसले कर्म ? , कसला जन्म आणि कसला मृत्यू  ? कोठेच काहीच  नाही !



संत सोहिरोबानाथ म्हणतात तसे .....

आलो नाही , गेलो नाही I मध्ये दिसणे हे भ्रांती I

जागृत होता स्वप्नची हरपे I कर्पूरन्याये जग  हरले I

Wednesday, 30 April 2014

श्रद्धा आणी तिचे महत्व






अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत I
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह II  भ. गि . १७-२८
 


हे पार्थ , अश्रद्धेने केलेले हवन ,दिलेले दान , आचरलेले तप व केलेले जे कर्म असेल त्याला अ सत असे म्हणतात . हे अ सत या लोकी व परलोकीही लाभदायक नाही . म्हणून भगवंताला अर्पण करताना नितांत श्रद्धेची आवश्यकता आहे .

खूप पूर्वी एकदा भारतात मोठा दुष्काळ पडला होता . एक गाव जे पूर्णपणे शेतीवरच निर्भर होते ते ह्या दुष्काळाच्या कचाट्यात खूप  वाईट सापडले.पावसा अभावी नद्या ,नाले , झरे , विहिरी  सुकल्या  , जमीन कोरडी पडली . अन्न नाही , पाणी नाही , प्राण्यांना द्यायला गवत नाही अशी परिस्तिति.  त्यात वरून सूर्याचे व खालून जमिनीचे रणरणत्या निखार्यागत चटके. हळू हळू प्राणी व लोकं मारू लागले.पाण्याच्या एका थेंबा साठी व एका अन्नाच्या घासासाठी चोर्या व दरोडे पडू लागले. गावची लोकं बिचारी हवालदिल झालेली .
शेवटी गावच्या जाणत्या लोकांनी गावातील देवळाच्या पुजार्याला विनंती केली दुष्काळ जाण्यासाठी आणि वर्षा वृष्टी होण्यासाठी काहीतरी दैवी उपचार करावे . पुजारी ब्राम्हणाने सांगितले कि उद्या सर्व गावकर्यांनी मंदिराच्या प्रांगणात जमावे . आपण सर्व मिळून परमेश्वराची प्रार्थना करूयात , पाउस नक्की पडेल व दुष्काळ मिटेल .
दुसऱ्या  दिवशी सांगितल्या प्रमाणे सगळे गावकरी देवळाच्या प्रांगणात जमले .एक गरीब गावकरी जो जरा उशिरा पोचला होता त्याचाकडे सर्व अचंब्याने पाहू लागले . जणू काही विचित्र देखावा पाहावा तसे . त्या गावकर्याने सोबत छत्री आणलेली होती .रणरणत्या उन्हात , पाउसचे एक हि चिन्ह किंवा ढग नसताना ह्या वेड्याने छत्री आणली हे पाहून सर्व गावकरी हसून जणू त्याची टर खेचू लागले .दृश्य होते हि मोठे विचित्र .पाउस नाही , पाउसाचा थेंब नाही आणि हा आपला आला छत्री घेऊन ! असो .
प्रार्थनेचा कार्यक्रम यथासांग पार पडला व सर्व आपापल्या घरी जाण्यास निघाले.कुतूहलाने व कुत्सित पणे काही लोकांनी त्याला छत्री आणल्या बद्दल विचारले .
"आर  वेड्या , पाउसाचा मौसम नाई , पाउसचे चिन्ह कुणीकडे दिसत नाई , आणि तुरे मारे छत्री घेऊन आलास . कश्या पाई ?
तो गावकरी म्हणाला  " लोकांनु , देव देतो नि देवच घेतो . मला खात्री हाय कि देव आपली प्रार्थना ऐकेल आनी मोप पाउस पडल , देवाच्या करणीने दुष्काळ मिटल ."
लोकं त्याच्यावर हसायला लागले, त्याला वेडाऊ लागले  , त्यांना दिसत होते ते रणरणते उन जे आजूनही अंगाला चटके देत होते .त्याची श्रद्धा व विश्वास कोणालाही दिसत नव्हता .
आणी अचानक , अघटीत घडले ...
सुसाट वारा वाहू लागला , काळे ढग जमू लागले , वीज कडाडली आणी धोधो पाउस पडू लागला . सर्व गावकरी विस्मयीत झाले , त्यांच्या कुत्सित नजरा पाणावल्या . त्यांचे डोळे उघडले .त्यांनी मान्य केले कि त्या एकट्या गावकर्याच्या भक्ती पूर्ण व श्रद्धेने केलेल्या प्रार्थने मुळेच पाउस पडला . बाकी सर्व गावकरी फक्त नावाला जमले होते .

म्हणूनच भगवान श्री कृष्ण म्हणतात कि प्रत्येक कर्मात श्रद्धा असणे आवश्यक आहे .अश्रद्धेने केलेले कोणतेही कर्म फलत नाही . ना या लोकांत ना परलोकांत