Total Pageviews

Thursday, 2 April 2026

कृपेचा निर्झर


तुझ्या कृपेच्या कथा ऐकल्या मी बहुत,
आज मीही अनुभवला स्पर्श तो अद्भुत।

शब्द माझे हरवले गहिवराच्या प्रवाहात,
कृतज्ञ अश्रू ओघळती शांत ह्या डोळ्यांत।

कसे फेडू दत्ता तुझ्या प्रेमाचे पांग,
करितो प्रार्थना—नित्य ठेवावा संग।

मनपटलावर निर्झरती तुझ्या कीर्तीचे उखाणे,
मन भरून येते आठवून तुझे तराणे।

तुच केली सरस्वती बहाल माझ्या शब्दांना,
केली लय प्रदान माझ्या कवितांना।

ठेव अशीच कृपा नित्य माझ्यावर,
मिळो कीर्ती नि भुक्ती मम कवितेवर।

बीज गीताचे रोवलेस तूच—तूच वृक्ष कर आता,
दत्ता, तव इच्छेविण दुज्या कुणाची काय गाथा।

‘मेघ’ जरी बरसतो धरेवर—जल कोठूनी आणतो?
बाष्प करून देते धरा—तेच तिला अर्पितो।

गुरुवार, २ एप्रिल २०२६ | १:३१ PM
अजय सरदेसाई ‘मेघ’

Wednesday, 1 April 2026

शब्दातीत




निखळले आकाश तारकांचे,
मी न मोजले तुकडे त्याचे।
क्षण होता एवढाच — जगण्याचा पूर्ण,
ना प्रश्न उरले, ना क्षण उत्तरांचे।

स्तब्ध सर्व — शरीर, मन नि विचार,
फक्त स्पंदन हृदयाचे — हाच व्यवहार।
एक सणक मुळातून सळसळली वर,
थेट सहस्राराशी भिडली सरसर।

हिच का ती गायत्री, कुंडलिनी झाली जागृत,
भंगले आकाश — का हिलाच भेटण्यास मूर्त?
कळेना काहीच — ना तो विचारही उत्स्फूर्त,
स्तब्ध सर्व — मी होतो साक्षी फक्त।

काहीच नव्हते — होती जाणीव फक्त,
तीही अक्षर नव्हे — क्षणीक,नाशिवंत।
अवर्णनीय उन्माद — त्या निमिषात होता,
शब्दातीत तो अनुभव कुणाचा होता?


— अजय सरदेसाई ‘मेघ’
बुधवार, १ एप्रिल २०२६ | १२:४५ दुपारी