Total Pageviews

Friday, 29 December 2023

तुम्हाविण दत्ता मला कोण तारी


मनोहर पद्मयुगुल अमंगळहारी

सेविता जे भक्तांचे भव दुःखहारी

लावण्य सहस्रचद्रांचे यती मुखावरी।

तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ।।१।।

 

भक्तांस राखसी जन्मजन्मांतरी।

वसतो तो यती अजून गाणगापुरी।

भक्त जनांसी जो सदा कैवल्यकारी।

तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ।।२।।

 

चाले तुझी सत्ता या विश्वाम्बरी। 

सकळ जगाचा जो पालनहरी। 

सकळ जनांचा तूची कैवारी। 

तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ।।३।।

 

सहस्त्र सूर्याचे तेज ज्याच्या मुखावरी।

सदा करी दूर जो भक्तांचे तिमिरी।

वात्सल्य द्रीष्टी पाहे सदा भक्तां वरी।

तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ।।४।।

 

कानी रुद्राक्ष कुंडले जटाभार डोक्यावरी।

निर्मळ गंगा नीर वाहे सळसळ जटाभारी।

भक्तांसी असे सर्वदा जो कल्याणकारी।

तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ।।५।।

 

त्रिशूल गदा चक्र करी जे रक्षणकारी।

शंख डमरू पद्म ही जे सर्व हितकारी।

रुद्राक्ष माळा झोळी सत्वगुणकारी। 

तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ।।६।।

 

जीवन समरांत जो सर्व निर्विघ्न वाटकरी।

भक्ताचा धरुनी कर जो करवी भवपारी।

लोटांगण 'मेघाचे' सदा तया पद्मयुगमांवरी।

तुम्हाविण दत्ता मला कोण तारी ।।७।।



।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। 

 

शुक्रवार दिनांक २९/१२/२०२३, १०:०५ AM

अजय सरदेसाई (मेघ ) 

No comments:

Post a Comment