Total Pageviews

Tuesday, 24 June 2025

भक्ती आणि श्रद्धा : AC की DC? — एक विचार


 

भक्ती आणि श्रद्धा : AC की DC? — एक विचार

कधी कधी मनात एक विचार डोकावतो – हे संत-महात्मे आपल्यासारखेच होते का? त्यांनी एवढी गुरुकृपा कशी मिळवली? त्यांना इतके अद्भुत अनुभव का आले? आपल्याला का नाही...?

गुरु-शिष्य परंपरेतील काही उदाहरणे:

  • श्रीपाद श्रीवल्लभ – शंकर भट्ट
  • श्री नृसिंह सरस्वती – सायंदेव साखरे
  • श्री स्वामी समर्थ – श्री स्वामी सूत
  • श्री रामकृष्ण परमहंस – श्री विवेकानंद
  • श्री महावतार बाबाजी – श्री लहरी महाशय
  • श्री शंकर महाराज – श्री जी. के. प्रधान
  • श्री महेंद्रनाथ महाराज – श्री “एम”

या सर्व गुरु-शिष्य द्वयी डोळ्यांसमोरून तरळून जातात. त्यांच्या जीवनात अद्भुत गुरु, विलक्षण अनुभूती आणि अपार लोककल्याण दिसतं. आणि मग सहज मनात प्रश्न उमटतो – आपण त्यांच्या इतके/सारखे का नाही? आपल्यात आणि त्यांच्यात नेमका फरक काय?

 

भक्तीची एक वैज्ञानिक उपमा

मी एक अभियंता असल्यामुळे मनात सहजच एक तांत्रिक उपमा सुचली – या सर्व संतांची भक्ती म्हणजे DC (Direct Current) प्रमाणे आहे – स्थिर, एकसंध, अखंड. आणि आपली भक्ती AC (Alternating Current) प्रमाणे – हेलकावणारी, उतार-चढावांनी भरलेली, आणि अनेकदा दिशाहीन.

 

संतांची भक्ती — DC Current

DC म्हणजे थेट प्रवाह – एका दिशेने सातत्याने वाहणारी विद्युतधारा. संतांची भक्ती आणि श्रद्धाही तशीच असते:

  • सातत्य – एकदा मन ईश्वरावर स्थिरावले की, त्यातून ते ढळत नाही.
  • दिशा निश्चित – त्यांच्या संपूर्ण जीवनाचा हेतू एकच – आत्मसाक्षात्कार व लोककल्याण.
  • संकटांतही अढळ श्रद्धा – कितीही दुःख आले, तरी श्रद्धा कधीही खचत नाही.

 

आपली भक्ती — AC Current

AC म्हणजे पर्यायी प्रवाह – जो वेळोवेळी दिशा आणि तीव्रता बदलतो. आपली भक्ती बहुतांश वेळा अशीच असते:

  • हेलकावे – कधी साधनेत उत्साह, कधी कंटाळा; कधी पूर्ण श्रद्धा, तर कधी शंका.
  • बाह्य प्रभावांचे आक्रमण – संसार, अपेक्षा, दुःख, अहंकार यामुळे भक्तीचा प्रवाह अडतो.
  • ऊर्जा असूनही दिशा नाही – भक्तीची ताकद असली तरी ती केंद्रीत नसते.

 

मग हा फरक मिटवायचा कसा?

ही तुलना केवळ निरीक्षण नाही, तर दिशादर्शकही आहे. AC ला जर converter द्वारे DC मध्ये रूपांतर करता येतं, तर आपली भक्तीही अधिक स्थिर व सशक्त करता येऊ शकते.

या रूपांतरणासाठी आवश्यक असणारा "कन्वर्टर" म्हणजे – आपलं ‘मन’ .

त्यावर ताबा मिळवणं, त्याला शुद्ध व स्थिर करणं, आणि त्याचं लक्ष्य सद्गुरूंकडे वळवणं हे आवश्यक आहे. यासाठी काही उपाय:

भक्ती स्थिर करणारे उपाय:

1.   नित्य साधना – दररोज ठरावीक वेळ गुरू वा ईश्वरस्मरणासाठी राखून ठेवणं.

2.   श्रद्धेची निगराणी – मन संशय करेलच, पण पुन्हा पुन्हा श्रद्धेकडे वळणं.

3.   सत्संग व संतविचार – संतांच्या जीवनाचा अभ्यास आपल्याला जागृत ठेवतो.

4.   तुलना न करता आदर – आपल्या प्रवासाची तुलना इतरांशी न करता, त्याचा आदर करणं.

 

AC ते DC : भक्तीचा प्रवास

अशा पद्धतीने अस्थिर (AC) भक्ती आणि श्रद्धा हळूहळू स्थिर (DC) भक्तीत रूपांतरित होऊ लागतात.

एकदा हे रूपांतर झाले, की श्रद्धेची तीव्रता – म्हणजेच DC चं potential – वाढू लागते.

शून्य (0) पोटेन्शिअलपासून अनंत () पोटेन्शिअलकडे प्रवास सुरु होतो.

त्या दिवशी, जेव्हा हे अनंत पोटेन्शिअल गाठलं जातं, तेव्हाच "मुक्ती" प्राप्त होते.

मुक्ती म्हणजे तरी काय?
अनंत होणं – कोणत्याही तुलनात्मक चौकटीत न मावणं. त्या सर्वाच्या पलीकडे जाणं. नाही का?

 

"प्रत्येक हृदयात एक संत सुप्त अवस्थेत असतो. काहीजण त्याला जागं करतात, काहीजण त्याचं अस्तित्व विसरून जातात."

गुरुकृपा कोणावरही कधीही होऊ शकते – फक्त मन शुद्ध, सातत्यपूर्ण आणि श्रद्धेने ओतप्रोत असावं लागतं.

AC पासून DC पर्यंतचा हा प्रवास – हाच साधनेचा खरा मार्ग, हाच तपश्चर्येचा सार!

त्या 'DC' साधनेच्या प्रवाहात स्वतःला अर्पण करा.

तुम्हाला हा विचार पटला असल्यास जरूर कळवा.

 

मंगळवार, २४/६/२०२५ | ०२:१० PM
अजय सरदेसाई (मेघ)

Thursday, 19 June 2025

दोष ना कुणाचा!

 


आळीतून पतंग निघतो करून संग्राम,

सृष्टीची ही गूढ रचनानिसर्गाचा नियम.

 

क्षणभंगुर जिवन त्याचे ,जिव तो क्षणाचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.

दोष ना कुणाचा!

 

वाळवंटी दिसे मृगजळफसतो भटकळ,

खरे नव्हे ते रे वेड्या असे मायाजाळ.

 

वाळवंटाचा धर्म नव्हे,हा खेळ निसर्गाचा,

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.

दोष ना कुणाचा!

 

कालवे हरवले काननातं व्याघ्र करी भक्ष्य,

हंबरडुन शोधे धेनु पाणावले अक्ष.

 

जन्म पुढील असे त्याचा पुण्य ब्राम्हणाचा,

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.

दोष ना कुणाचा!

 

जे जे दिसे या डोळ्यांनी ते ते सर्व मर्त्य,

फुका रडतोस गेले म्हणून,जणु जाहला अनर्थ.

 

येणे जाणे निश्चित बाळा,हा नियम प्रकृतीचा,

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.

दोष ना कुणाचा!

 

गुरुवार १९/६/२०२५ , २०:२० hrs.

अजय सरदेसाई (मेघ)


Wednesday, 18 June 2025

मानस – १० वर्षांनी पूर्णत्वाची भेट


१० वर्षांपूर्वी एका सकाळी, सुखासनात बसून मी एक नीलविवर पाहिलं होतं.त्या ध्यानात मी एक सरोवर पाहिलंत्याच्या पाण्यात निळे गोलक, वर सात तेजवलय, आणि पार्श्वभूमीला एक शुभ्र हिमशिखर.तो एक *"दृश्य-निदर्शनाचा"* अनुभव होताअस्पष्ट, तरी खरा.

 

आज, १० वर्षांनी मी मानस सरोवराच्या काठावर उभा आहे.या दहा वर्षात आयुष्यात बरेच काही घडून गेले आणि कित्येक अनुभव येऊन गेले. काही गोड काही वाईटही. पण त्याची चर्चा पुढे कधीतरी . आज मात्र या मानस सरोवराची आणि माझी गोष्ट मी कथन करणार आहे .

 

पाठीवरचा त्रिकूट थकलाय, पण मन शांत, निःशब्द आणि तयारआहे.सहप्रवासी लांब गेले आहेत, मी एकटाच इथं उरलो आहे.हवा विरळ आहे, पण प्रत्येक श्वासा सरशी अंतरंगात काही तरी नवं घडत आहे. मी वाळूत खाली टेकलो ,डोळे मिटले आणि तोच प्रकाश परत आला.

 

डोळे उघडतो तर शरीर थरथरले , अधर विलगच राहिले . शरीरावर रोमांच दाटले .समोर दहा वर्षां पूर्वेचे तेच दृश्य प्रत्यक्षात होते .तेच निळसर पाणी, त्यावर निथळणारी शांतता, आणि समोरचं शुभ्र हिमशिखर.अगदी जसं ध्यानात पाहिलं होतंअगदी तसं. तेव्हा पाहिलं नव्हतं पण अनुभवलंहोतं.क्षणभर माझ्या अंगावर काटा आला .हे दृश्य माझं स्वप्न नव्हतं, हे उमगून आलं

 

माझे डोळे पाणावले . मी गुडघे टेकून बसलो .संपूर्ण वातावरण नीरव. फक्त वारा काय तो वाहत होता .त्या निळ्या सरोवरात आता हलकीशी लहर उठते.आणि सरोवराच्या मधोमध,माझ्या दृष्टिपथात पुन्हा तेच सात निळे गोलक तरंगताना दिसतात.

 

ते गोलक मला पुन्हा बोलावत आहेत.माझा संपूर्ण अस्तित्व शरीरातच आहे, पण माझी ओळख मात्र पाण्याकडे ओढली जाते आहे.मी उठतो, टोकाला जातो, आणि दोन्ही हात जोडून पाण्यात वाकतो.

 

क्षणभर विचार येतोमी आत जाईन तर परत येईल का?”

 

मग दुसऱ्याच क्षणी उत्तर येतं

 

"जेमी आत जातं तेच खरंमीअसतं. बाकीचं सगळं परत यायचंच नसतं.”

 

मी पाण्यात उतरतो.पाणी निथळतं, गारसरतं,पण त्यात भीती नाही.एक छान उब आहे .त्या सात गोलकांच्या दिशेने मी पोहतोअगदी मध्यभागी पोहोचल्यावर काही प्रकाशलहरी झुळझुळतात

आणि त्या प्रकाशातते पुनःप्रकट होतात.

 

समोर महाराज उभे आहेत !!!!!! खरंच !!!!!!!!!

हो,माझे सद्गुरू.

ज्यांच्या तसबिरीला मी १० वर्षं नमस्कार करत आलोतेच

ते आज माझ्यासमोर उभे आहेत! कपाळावर चंदन, मुखकमलावर मिश्किल हास्य.काहीही बोलत नाहीत,फक्त हात पुढे करतात. मी माझा हात पुढे करून त्याच्या हातात देतो. हात हातात देताच मी ही महाराजां सारखाच दिसू लागतो . महाराजांना लपवून मला दाखवला तर कोणी ही संशय घेतला नसता इतके साम्य आमच्यात होते . काही कळण्या पलीकडे होते आणि काही कळावे ही इच्छा ही नव्हती . हे क्षण असेच अविरत राहावे असे मात्र राहून राहून वाटत होतं.कोठूनतरी एक आवाज येत होता ......

 

हेच आहे तुझं पूर्ण रूप”.

प्रकाशही आहे, सावलीही आहे. ध्यानही आहे, अनुभवही. शब्दही आहेत, पण आता मौनात विरून गेले आहेत.

मी तू आणि तू मी आहे , कोणते ही द्वैत आता उरले नाही ”. असे म्हणून महाराज माझ्यात सामावतात .

मी पुन्हा डोळे उघडतो.मानस सरोवर शांत आहे.गोलक गेले आहेत.हवा थंड आहे आणि माझं अंतरंग कोऱं आहे, पण पूर्ण आहे.मी मागे वळतो.सहप्रवासी पुन्हा दिसतात.मी त्यांच्यात सामील होतो

पण आता 'मी' बदललोय.

मी गेलो नव्हतो

मी परतआलोय.

 

"जेव्हा ध्यानात पाहिलेलं वास्तवात प्रकटतं,तेव्हा शब्द नाहीसे होतातआणि उरतं फक्त अनुभवाचं तेज

 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।

 

अजय सरदेसाई (मेघ)

मानस सरोवर, तिबेट

गुरुवार, तारीख : ??/??/??  वेळ : ??:??