आजच्या ध्यानात जाण्यापूर्वीच मनात कालच्या तेजोबिंदूचा प्रकाश ठाण मांडून बसला होता. ४ चिच वेळ, वातावरण कुंद उजेड खिडकीतून चंद्र प्रकाश झिरपत होता. सगळं शांत.
मी पुन्हा सुखासनात बसलो. डोळे मिटले आणि श्वास
शांत करताच जाणिवेच्या कडांवर पुन्हा त्या प्रकाशाच्या लाटांनी टक्कर दिली.
माझं अस्तित्व आता थेट त्या निळसर कमळाच्या तेजोबिंदूशी
जोडले गेलं. शरीराच्या मर्यादा विरून गेल्या, आणि मी पुन्हा त्या आभासी जागेत पोहोचलो,
जिथे काळ, दिशा आणि भौतिकता ह्या संकल्पनाच अस्तित्वात नव्हत्या.
ते तेज अजून गडद झळाळत होतं. आज त्याभोवती एक
नवा रंग होता – सोनेरी केशरी.
माझ्या उपस्थितीला जणू त्या तेजाने हाक दिली.
“ये… अधिक जवळ ये…”
तो नाद फक्त ऐकला गेला नाही, तर अनुभवला गेला.
मी जवळ सरकलो. आणि मग...
त्या तेजोबिंदूतून एक हात पुढे आला. पण तो शारीरिक
नव्हता – तो स्पर्शाचा अनुभव होता.
त्या हाताने माझ्या डाव्या छातीकडील भागाला स्पर्श
केला.आणि एकाएकी माझ्या आत खोल कुठून तरी एक नाद उमटला.
" ॐ आदी चैतन्याय विद्महे
परम पुरुषाय धीमहि
तन्नो नित्य प्रचोदयात …"
हा फक्त मंत्र नव्हता ,हे माझ्या हृदयाचे स्पन्दन बनले होते.त्या एका स्पर्शाने माझ्या आत लपलेली दाहकता, भीती, मोह, व्यग्रता – सगळं वितळू लागलं.मी थरथरलो. पण त्या थरथरण्यामध्ये ही एक स्थिरता होती.माझं 'मी' पण वितळताना, एक नवा"मी" आकार घेत होतं —
ते शुद्ध, निर्विकार, आणि निळ्याच्या पलीकडचं.आणि अचानक,माझ्यासमोर एका प्रकाशमूर्तीचा साक्षात्कार झाला.ती मूर्ती स्पष्ट नव्हती, पण तिच्या भोवती सात तेजवलय होते .ती न बोलता बोलत होती—
“तूच आहेस. ज्याला शोधतोस,
तो तुझ्यातच आहे.”
मी त्या प्रकाशाकडे झेपावणार, इतक्यात…
माझ्या कानांवर पुन्हा घड्याळाची टिक टिक.हळूच डोळे उघडले.
सकाळ झालेली होती .घड्याळांत सकाळचे ७वाजले होते .खिडकीतून सूर्यप्रकाशाची एक तिरीप माझ्या कपाळावर येऊन स्थिरावली होती.माझ्या आतल्या ठिकाणी एक मंत्राचे कंपनअजूनही गुणगुणत होते.मी महाराजांना नमस्कार केला, आणि सहजच ओठांवर शब्द आले —
"आज मला माझा स्पर्श झाला."
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment