आज पहाटे उठताना एक विचित्र भावना मनात दाटून आली होती. कालच्या तेजस्पर्शानंतर मन एकीकडे शुद्ध शांततेने न्हाऊन निघालं होतं, पण आज एक हळवी छाया कुठूनशी मागे लागल्यासारखी वाटत होती.
मी ध्यानासाठी बसलो.सारं वातावरण पूर्वीसारखंच होतं, पण आत काही तरी वेगळं… हलकंसं, पोकळसारखं.डोळे मिटताच एक नवंच दृश्य उलगडू लागलं.
मी पुन्हा त्या आभासी सरोवराजवळ होतो. पण आज सरोवरात प्रकाश नव्हता.ते निळं सरोवर एका धूसर संध्याछायेत हरवल्यासारखं वाटत होतं.
पाणी
स्थिर होतं…
गोलक
नव्हते…
राजहंस
नव्हता…
फक्त
मी होतो – आणि माझीच सावली.
त्या
सावलीकडे पाहून क्षणभर गोंधळलो.
ती सावली माझ्यासारखीच होती, पण तिचं रूप वेगळं होतं.
ती गदगदलेली, थकलेली, आणि किती तरी काळ लपवून ठेवलेली वाटत होती.
माझं
मन क्षणभर मागे गेलं—
बालपणातले काही हळवे प्रसंग,
अस्वस्थतेत झोपलेल्या रात्री,
काही
अव्यक्त दुःख,
काही
हरवलेली नाती,
काही बोलूनही न बोललेली वेदना…
त्या
सर्वाचा चेहरा आज माझ्याच सावलीत उतरलेला होता.
मी पुढे सरकलो.
ती सावली मागे सरकली.
मी थांबलो. तीही थांबली.
शेवटी,
मी धीर करून तिच्या डोळ्यांत पाहिलं.
ती सावली रडत होती.
ते अश्रू दुखाचे नव्हते—
ते स्वीकृतीचे होते.
"मी तुझंच एक रूप आहे… तू मला किती काळ झटकून टाकत आलास.
पण मी तुझ्यातच आहे – तुझ्या प्रकाशाला पूर्णत्व फक्त माझ्या स्वीकारातून मिळेल."
या शब्दांनी मी दचकून गेलो.कारण त्या सावलीचा आवाज माझ्याच अंतःकरणातून उमटत होता.त्या क्षणी, एक तेजकिरण पुन्हा आकाशातून सरकून खाली उतरला.त्याने सरोवरात तरंग निर्माण केले.
सावलीतून प्रकाश बाहेर पडू लागला… ती सावली झिरपत, विरत गेली… आणि सरोवरातून एकच प्रकाशमूर्ति वर सरकू लागली.
ती मूर्ती माझीच होती—
पण आता ती संपूर्ण होती.
प्रकाशासहित आणि सावलीसहित.
डोळे उघडले.रुम मध्ये मंद उजेड पसरलेला.घड्याळाने सहा वाजल्याची घोषणा केली.मी उठलो, पण आजचं हसू वेगळं होतं.
आज मी स्वतःला पूर्णपणे भेटलो होतो.
मी उठून उभा राहिलो आणि महाराजांच्या तसबिरीला हातजोडून नमस्कार केला . खोलीत मंद हिनेचा परिमळ पसरला होता . महाराज प्रसन्न चेहऱ्याने स्मित हास्य करत होते.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment