१० वर्षांपूर्वी एका सकाळी, सुखासनात बसून मी एक नीलविवर पाहिलं होतं.त्या ध्यानात मी एक सरोवर पाहिलं… त्याच्या पाण्यात निळे गोलक, वर सात तेजवलय, आणि पार्श्वभूमीला एक शुभ्र हिमशिखर.तो एक *"दृश्य-निदर्शनाचा"* अनुभव
होता — अस्पष्ट, तरी खरा.
आज, १० वर्षांनी मी मानस सरोवराच्या काठावर उभा आहे.या दहा वर्षात आयुष्यात बरेच काही घडून गेले आणि कित्येक अनुभव येऊन गेले. काही गोड काही वाईटही. पण त्याची चर्चा पुढे कधीतरी . आज मात्र या मानस सरोवराची आणि माझी गोष्ट मी कथन करणार आहे .
पाठीवरचा त्रिकूट थकलाय, पण मन शांत, निःशब्द आणि तयारआहे.सहप्रवासी लांब गेले आहेत, मी एकटाच इथं उरलो आहे.हवा विरळ आहे, पण प्रत्येक श्वासा सरशी अंतरंगात काही तरी नवं घडत आहे. मी वाळूत खाली टेकलो ,डोळे मिटले आणि तोच प्रकाश परत आला.
डोळे
उघडतो तर शरीर थरथरले , अधर विलगच राहिले . शरीरावर रोमांच दाटले .समोर दहा वर्षां पूर्वेचे तेच दृश्य प्रत्यक्षात होते .तेच निळसर पाणी, त्यावर निथळणारी शांतता, आणि समोरचं शुभ्र हिमशिखर.अगदी जसं ध्यानात पाहिलं होतं — अगदी तसं. तेव्हा “पाहिलं नव्हतं पण अनुभवलं”होतं.क्षणभर माझ्या अंगावर काटा आला .हे दृश्य माझं स्वप्न नव्हतं, हे उमगून आलं
—
माझे
डोळे पाणावले . मी गुडघे टेकून बसलो .संपूर्ण वातावरण नीरव. फक्त वारा काय तो वाहत होता .त्या निळ्या सरोवरात आता हलकीशी लहर उठते.आणि सरोवराच्या मधोमध,माझ्या दृष्टिपथात पुन्हा तेच सात निळे गोलक तरंगताना दिसतात.
ते गोलक मला पुन्हा बोलावत आहेत.माझा संपूर्ण अस्तित्व शरीरातच आहे, पण माझी ओळख मात्र पाण्याकडे ओढली जाते आहे.मी उठतो, टोकाला जातो, आणि दोन्ही हात जोडून पाण्यात वाकतो.
क्षणभर विचार येतो — “मी आत जाईन तर परत येईल का?”
मग दुसऱ्याच क्षणी उत्तर येतं —
"जे ‘मी आत जातं तेच खरं ‘मी ‘ असतं. बाकीचं सगळं परत यायचंच नसतं.”
मी पाण्यात उतरतो.पाणी निथळतं, गारसरतं,पण त्यात भीती नाही.एक छान उब आहे .त्या सात गोलकांच्या दिशेने मी पोहतो… अगदी
मध्यभागी पोहोचल्यावर काही प्रकाशलहरी झुळझुळतात…
आणि त्या प्रकाशात — ते पुनःप्रकट होतात.
समोर महाराज उभे आहेत !!!!!! खरंच !!!!!!!!!
हो,माझे सद्गुरू.
ज्यांच्या तसबिरीला मी १० वर्षं नमस्कार करत आलो — तेच
ते आज माझ्यासमोर उभे आहेत! कपाळावर चंदन, मुखकमलावर मिश्किल हास्य.काहीही बोलत नाहीत,फक्त हात पुढे करतात. मी माझा हात पुढे करून त्याच्या हातात देतो. हात हातात देताच मी ही महाराजां सारखाच दिसू लागतो . महाराजांना लपवून मला दाखवला तर कोणी ही संशय घेतला नसता इतके साम्य आमच्यात होते . काही कळण्या पलीकडे होते आणि काही कळावे ही इच्छा ही नव्हती . हे क्षण असेच अविरत राहावे असे मात्र राहून राहून वाटत होतं.कोठूनतरी एक आवाज येत होता ......
“हेच आहे तुझं पूर्ण रूप”.
प्रकाशही आहे, सावलीही आहे. ध्यानही आहे, अनुभवही. शब्दही आहेत, पण आता मौनात विरून गेले आहेत.
“मी तू आणि तू मी आहे , कोणते ही द्वैत आता उरले नाही ”. असे म्हणून महाराज माझ्यात सामावतात .
मी पुन्हा डोळे उघडतो.मानस सरोवर शांत आहे.गोलक गेले आहेत.हवा थंड आहे आणि माझं अंतरंग कोऱं आहे, पण पूर्ण आहे.मी मागे वळतो.सहप्रवासी पुन्हा दिसतात.मी त्यांच्यात सामील होतो —
पण आता 'मी' बदललोय.
मी गेलो नव्हतो…
मी परतआलोय.
"जेव्हा ध्यानात पाहिलेलं वास्तवात प्रकटतं,तेव्हा शब्द नाहीसे होतात…आणि उरतं फक्त अनुभवाचं तेज”
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।
अजय सरदेसाई (मेघ)
मानस सरोवर, तिबेट –
गुरुवार, तारीख :
??/??/?? वेळ : ??:??
No comments:
Post a Comment