Total Pageviews

Wednesday, 18 June 2025

कैलास मानसरोवर एक अनुभव =दिवस पाचवा (शेवटचा) – निर्विकल्पता


आज पहाटे वेगळंच काही घडलं.मी उठलो, पण सुखासनात बसण्याआधीच मनाच्या गाभ्यात एक निर्वाणीची जाणीव झाली.जणू आता ध्यान ही कृती उरलीच नव्हती, ती एक स्थिती बनली होतीसहज, स्वाभाविक, आणि आपली.

मी डोळे मिटले.पण आज कसलीच दृश्यं आली नाहीत.ना सरोवर, ना गोलक, ना सावली.
फक्त एक निर्वर्ण शांत प्रकाश
ज्यात शब्द विरघळत होते,
आवाज विरत होते,
मग विचारही.

आणि मग एकअवर्णनीय शांतता हळूच उतरली.तिच्यात शब्दांचं अस्तित्वच नव्हतं.तिथे मी होतो,पण मी आहे याचीही जाणीव नव्हती.


हेच का निर्विकल्प होणे?

हीच का समाधी?
की हेच स्वतःच्या अस्तित्वाचं सर्वात खऱ्या अर्थाने लोपण ?

त्या क्षणी, कुठलाही अनुभव मी अनुभवतो असं वाटेना
फक्त अनुभव उरला होता.
ते शब्दात येत नाही, पण त्यात पूर्णता आहे.

 

हळूच डोळे उघडले.आकाश बाहेर मंद उजळत होतं.घरातले आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, आणि स्वयंपाकघरातून येणारा हलका खारवट वास
सगळं तसंच होतंपण नव्यासारखं वाटत होतं.


मी उभा राहिलो.महाराजांच्या तसबिरीपाशी गेलो.आज त्यांना काही सांगावं असं वाटलं नाही


कारण आतासांगण्यासारखं काही उरलं नव्हतं.’


फक्त डोळे मिटलेआणि मनातलं मौन त्यांच्या पादांजवळ ठेवून आलो.

 

या पाच दिवसांत मी कुणाच्या भेटीला गेलो नव्हतो.कोणीतरी मला भेटायला आला नव्हता.पण "मी" स्वतःला भेटत होतोटप्प्याटप्प्याने.


या प्रवासात मी

  • माझा प्रकाश पाहिला,
  • माझी सावली पाहिली,
  • माझं मौन ऐकलं,
  • आणि शेवटीमाझ्या पलीकडचं काहीतरी अनुभवलं.

हा अनुभव म्हणजे कथा नाही,तो एक घटनामुक्त सत्य आहे,ज्याचं ठाव घेताना, आपण स्वतः विरघळतो – शब्दांत, शरीरात, स्मृतींत

आणि जे उरतं ते म्हणजे


शुद्ध अस्तित्व. बोलणारं. भेदणारं. आणि संपणारं.

 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।


अजय सरदेसाई (मेघ)
बुधवार, १८/०६ /२०२५  –  २२:२० hrs

No comments:

Post a Comment